कुंतल देशाच्या मंत्र्याचा मुलगा, शशिकांत, आपल्या भद्र व जयंत ह्या मित्रांसोबत शिकार खेळण्यासाठी जंगलात गेला. त्या जंगलात हरीणे व रानटी डुकरे भरपूर होती. परंतु शशिकांत व त्याच्या मित्रांना या निष्पाप प्राण्यांना मारण्यांत कांही रस नव्हता. वाघ-सिंहांसारख्या हिंस्त्र, क्रूर व धोकादायक प्राण्यांची शिकार करण्याची त्यांची इच्छा होती. सिंहाच्या शोधांत ते जंगलात खूप दूरवर निघून गेले. दुपारच्या सुमारास त्यांना यश आले. ते एका ओढ्याच्या कांठाने निघाले होते. इतक्यांत ओढ्यापलीकडे एक सिंह उभा असलेला शशिकांतला दिसला. ओढ्याचे पाणी पिऊन तो सिंह पुन्हां जंगलात निघून जाण्याच्या तयारीत होता. शशिकांतने आपल्या मित्रांना तो सिंह दाखवीत म्हटले, ‘‘आपण घोडे इथेच सोडूं या आणि हळूंच ओढा पार करून त्या सिंहाला चारी बाजूंनी घेरूं या. आपल्यापैकी कोणाच्या तरी बाणाचे तो नक्कीच लक्ष्य ठरेल.’’ घोड्यावरून उतरून शशिकांत चालू लागणार इतक्यांत जयंतने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला थांबविले. तो म्हणाला, ‘‘शशिकांत, घाई करू नको. ओढ्याच्या त्या बाजूचे जंगल आपले नाही, तर कदम्ब राज्याचे आहे आणि त्या राजाशी आपले चांगलेच शत्रुत्व आहे. त्यांच्या हद्दीत जाणे आपल्यासाठी केवळ संकट नव्हे, तर धोकादायकही ठरूं शकते. शिकार करण्याऐवजी आपण स्वतःच संकटाची शिकार ठरूं. आपल्या प्राणांनाही धोका संभवू शकतो. त्या राज्याला आपल्या राज्यावर आक्रमण करण्याकरिता निमित्त मिळेल. आपल्याला जायबंदी करून ते आपल्या राज्याला कोणत्याही अटी मान्य करायला भाग पाडू शकतील.’’ |
|
|